Breaking
Updated: June 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील शुभांगी संतोष शिंदे हिच्या आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी संदीप काचगुंडे हा भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तो फरार असून, बर्दापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शुभांगी शिंदे हिने सासरच्या मंडळींच्या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. शुभांगीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे आणि पतीचा मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंद या चौघांना पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र संदीप काचगुंडे हा अद्याप फरार आहे. तो भाजपच्या धारूर तालुकाध्यक्षपदावर कार्यरत असल्यामुळे त्याच्या फरार होण्यात राजकीय पाठबळ आहे? असा संशय उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुभांगीच्या सासरच्या लोकांनी ऑप्टिकल दुकान सुरू करण्यासाठी तिच्या माहेराकडून सातत्याने पैशांची मागणी केली. माहेरच्यांनी यापूर्वी पाच लाख रुपये दिले होते, मात्र आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगीवर मानसिक दबाव आणण्यात येत होता. या सततच्या छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला. बर्दापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. संदीप काचगुंडे याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई व धारूर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात निष्पक्ष व कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.