Breaking
Updated: June 5, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड सहोदयाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर कधी अपयश आले तर खचून न जाता परत उभे राहिले पाहिजे. आयुष्याच्या शिखरावर पोहोचल्यावर मोडून पडू नका असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी केले त्या बीड सहोदया संस्थेतर्फे पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेजोगाई येथे आयोजित दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
सविस्तर वृत्त असे की, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोदार इंटरनॅशनल स्कूल अंबेजोगाई चे प्राचार्य कीर्तीकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर शारदा इंग्लिश स्कूल केज चे प्राचार्य सोनल मिश्रा यांनी बीड सहोदया चा अहवाल सादर केला. या सोहळ्यासाठी प्रतिष्ठित अतिथी प्रा.अभिजीत लोहिया, अॅड. संतोष पवार, आणि फिजिक्सवाला अकॅडमीचे डॉन बॉस्को जोसेफ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमाला शोभा देत होती.
मुख्य वक्ता चेतना तिडके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना जीवनाबद्दलचे महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या ओळींचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना जीवनसंघर्षाबद्दल प्रेरणा दिली. “स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक गुण लिहून काढा आणि त्यावर ठोस काम करा. सकारात्मक गुणातून आपल्याला नवी ऊर्जा मिळते आणि ती आपल्याला पुढे नेऊन जाते,” असा व्यावहारिक सल्ला त्यांनी दिला.
प्रा.अभिजीत लोहिया यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. “अभ्यासाबरोबर आरोग्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करावे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याशिवाय केवळ पुस्तकी ज्ञान कामी येत नाही,” असे त्यांनी प्रतिपादन केले. आधार माणुसकीचा फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भावी जीवनातील आव्हानांकडे लक्ष वेधले. “दहावी आणि बारावी नंतरचा प्रवास हा खरोखरच खडतर प्रवास आहे. पुढील शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर जावे लागणार आहे,
त्यामुळे समाजामध्ये कसे वागावे, कसे जगावे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शौर्य मुगदिया या विद्यार्थ्याच्या आई डॉ.रेखा मुगदिया यांनी व्यक्त केलेले विचार होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आम्ही त्याचे पालक दोघेजण डॉक्टर असून आमचा मुलगा इंजीनियरिंगची तयारी करतो. बीड सहोदयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
एमआयटी शाळेचे प्राचार्य सागर राऊत यांनी बीड सहोदया ऑलिम्पियाडचा तपशीलवार अहवाल सादर केला. या कार्यक्रमात बीड सहोदया ओलंपियाड मधून जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेजोगाईच्या अनुभवी शिक्षिकेने अत्यंत कुशलतेने केले. शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप रसाळ यांनी कार्यक्रमाला योग्य गती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ईगलवूड इंग्लिश स्कूल माजलगावचे प्राचार्य सत्यजित कांजळकर यांनी केले.