मदतीच्या बहाण्याने आलेल्या युवकाने स्कुटी पळविली
आष्टी - दुचाकी घसरून पडल्याने जखमी झालेल्या महिलेस उपचारांसाठी घेऊन जाताना मी पाठिमागून स्कुटी घेऊन तुम्हाला मदत करतो असे म्हणत एका युवकाने महिलेची दुचाकी लंपास केली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात युवकाविरुद्ध रविवारी (ता. 17) अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगर येथील संतोषी शशिकांत देशमुख (वय 44) या बहिणीसह नगर येथून सकाळी आष्टी येथे निघाल्या होत्या. रस्त्यात त्यांची बहीण स्कुटी घसरून पडल्याने जखमी झाली. तिला उपचारासाठी धानोरा येथे घेऊन निघाल्यानंतर तेथे एक अनोळखी युवक आला व त्याने संतोषी देशमुख यांना मी तुम्हाला मदत करतो. तुमची स्कुटी मी घेऊन येतो असे सांगितले. त्यामुळे संतोषी यांनी स्कुटी (क्रमांक एमएच-16 सीके-4120) युवकाकडे दिली व बहिणीस धानोरा येथे उपचारासाठी घेवून गेल्या. मात्र, मदतीच्या बहाण्याने स्कुटी घेऊन येतो म्हणणारा युवक स्कुटी घेऊन फरारी झाला. याबाबत संतोषी देशमुख यांनी अंभोरा पोलिसांत रविवारी (ता. 17) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.