Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सिंचनासाठी मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग, उन्हाळी पिकांना होणार लाभ

केज : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता धरणाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू करण्यात आला. तर बुधवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा धरणाखालील नागझरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत १६.५४ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील पिकांना भर उन्हाळ्यात वाढीसाठी फायदा होणार आहे.

    धनेगाव येथील २२४.०९३ दलघमी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे २५ सप्टेंबर २००४ रोजी १०० टक्के भरले होते. या धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह २० पाणीपुरवठा योजनेमार्फत ६३ गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०७. ३७६ दलघमी एवढा आसून धरणातील पाणी साठा ६०.६८ टक्के आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मांजराचे द्वार क्र. १,३,४,६ हे चार वक्र दरवाजे ०.२५ मिटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. तर बुधवारी सकाळी ७ वाजता आणखी धरणाचे द्वार क्र. २ व ५ हे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर १६.५४ दलघमी पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत सोडण्यात येणार आहे. रब्बी हंगामात डाव्या व उजव्या कालव्यातून प्रत्येकी दोन पाण्याची आवर्तने झाली आहेत. तर उन्हाळी हंगामसाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडणे सुरू आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील सिंचनासाठी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर आतापर्यंत डाव्या व उजव्या कालव्यातून एकूण १७.५४ दलघमी एवढे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. व सध्या दोन्ही कालव्यात उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सुरू आहे.

धरणामुळे १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील एकूण १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतर लांबीचा आहे. त्यातून १० हजार ५५९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी. अंतर लांबीचा असून त्याअंतर्गत ७ हजार ६६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी मांजरा धरण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

अतिदक्षतेचा इशारा

मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे धरणा खालील नदीपात्रात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी आदेश काढून अती दक्षतेचा इशारा संबंधित अधिकारी व पोलीस अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती मांजराचे शाखाधिकारी  सुरज निकम यांनी दिली आहे.

Wednesday 19th of March 2025 09:41 PM

Advertisement

Advertisement