बनसरोळा येथे ऊस पिक व्यवस्थापन कार्यशाळा
ऊस पिकाला खत व पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर : शिवप्रसाद येळकर
बनसरोळा - सद्यस्थितीत ऊस पिकामधील कीड-रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने करावयाचे नियोजन संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणीचे चेअरमन बी बी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅचरल शुगर, परादीप फॉस्फेटस ली. (जय किसान) व क्रांतीज्योती फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बनसरोळा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. पीपीएल कंपनीचे प्रतिनिधी शिंदे यांनी माती परीक्षण बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यांनी एप्रिल मे महिन्यामध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसानंतर प्रकाश सापळे वापरून हुमणी नियंत्रण, सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये निदर्शनास येत असलेले कीड, रोग व अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली विकृती यांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवल्या, जैविक व सेंद्रिय खतांचे महत्व, फर्मेंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर सोबत रासायनिक खतांची भट्टी लावून खतांची कार्यक्षमता वाढवण्याची पद्धती, पिकाच्या अवशेषांमध्ये सुप्त अवस्थेमधील किडींचे व घातक बुरशींच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्सचा वापर, नॅचरल शुगरच्या माध्यमातून माफक दरामध्ये नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर या भू-सुधारकाचा वापर करण्यासंदर्भात विस्तृत माहिती येळकर यांनी दिली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ऊस पिकाचे पाणी व खत व्यवस्थापन केल्याने होणारे फायदे बाबत विस्तृतपणे माहिती देऊन कारखान्यामार्फत ठिबक सिंचन संच बसवण्यासाठीची योजना बाबत येळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहायक पंडित काकडे, क्रांतीज्योती फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक दत्तात्रय काकडे जय किसानचे शेती सल्लागार अमजद पठाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* ऊस पिकामध्ये वाढत्या तापमानाचा ताण पडत असेल तर १३ : ०० : ४५ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट २ मिली व वसंत ऊर्जा ५ मिली प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
* ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेल्या ऊसावरील पोंगेमर व लोकरी माव्याच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिली प्रति किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १५ मिली किंवा फिप्रोनिल (५ टक्के एस.सी.) २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लोकरी मावा पानांच्या खाली असल्याने व त्यावर लोकरीसारखे आवरण असल्याकारणाने कीटकनाशकाचे द्रावण किडी पर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी द्रावणास चिकटपणा येण्यासाठी उत्तम दर्जाचे स्टिकर १ मि.ली प्रति लिटर द्रावणामध्ये मिसळावे तसेच फवारणी करताना फवारणीचे द्रावण पानांच्या खालच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने फवारणी करावी.
* ऊस पिकामधील चाबुक काणी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त ऊसाचे बेट मुळासकट उपटून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन नष्ट करावे हे करत असताना काळी पावडर इतर ऊसावर किंवा शेतामध्ये पडणार नाही याची काळजी घ्यावी. काणी रोगाच्या प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
शिवप्रसाद रामप्रसाद येळकर, ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर, रांजणी.
Wednesday 19th of March 2025 05:34 PM
