अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षाचा कारावास, ६५ हजाराचा दंड
केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
केज - एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा निकाल केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही आपल्या भावासोबत १४ डिसेंबर २०१८ रोजी कपडे धुण्यासाठी गावातील नदीवर गेले होते. यावेळी आरोपी सतिष दिलीप खंडागळे (रा. लाखा ता. केज. जि. बीड) याने या अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. याप्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी पीडित मुलीचा शोध लावल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणात पोस्कोचे कलम वाढविण्यात आले. या प्रकरणाचा तपास फौजदार अंकुश नागटिळक यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांच्यासमोर झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. तर फिर्यादी, पिडीत, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदार, तपासी अधिकारी अंकुश नागटिळक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तर साक्षीपुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपी सतिष दिलीप खंडागळे यास २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येत असल्याचा निकाल न्यायाधीश कुणाल जाधव यांनी दिला. सदर गुन्ह्यात केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी वेळोवेळी सरकार पक्षाला मदत केली. तर पैरवी अधिकारी म्हणून फौजदार राजाभाऊ लांडगे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. राम बिरंगळ यांनी बाजू मांडली.