गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने, नगदी १ लाख २० हजार लुटले
गेवराई - तालुक्यातील गोविंदवाडी येथील घराचा दरवाजा तोडून आतमध्यें प्रवेश करत घरातील प्रमुखास चापटाने मारहाण करून गळ्याला चाकू लावून घरामधील सव्वा तोळे सोन्याचे दागिने व नगदी एक लाख २० हजार रूपये लुटल्याची घटना तलवाड्याजवळील गोविंदवाडी येथे मध्यरात्री एक वाजता घडली. या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली. सकाळी तलवाडा पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात सहा ते सात दरोडे खोराविरोधात तलवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी कि, गोरख सुरेश मराठे (रा. गोविंदवाडी) यांच्याघरामध्ये रात्री सहा ते सात दरोडेखोरांनी घूसून त्यांना मारहाण करत गळ्याला चाकू लावला. घरातील कपाटामधील सव्वा तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रूपये लुटून नेले. या घटनेने तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तलवाडा पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी माळी, खाडे, काकडे, बांगर यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. दरम्यान अन्य एका ठिकाणी याच दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणचे सिसिटिव्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत.