साधु - संतांच्या सानिध्यात समाधान मिळते - नामदेव महाराज शेकटेकर
तळणेवाडीत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
गेवराई - जीवनात कितीही धन, संपत्ती, पद, पैसा मिळाला तरी मानसिक समाधान मिळत नाही. परंतू जे लोक साधु - संताच्या सहवासात राहतात ते कायम आनंदी आणि समाधानी राहतात. म्हणून साधु संतांच्या सानिध्यात रहा समाधान मिळेल जो समाधानी राहतो तो आत्मा स्वरुप देव राहतो. तसेच सप्ताहात काल्याला अनन्यसाधारण महत्त्व असून काला हा संताशिवाय होत नाही. सप्ताहात काल्यासारखे आत्मिक समाधान दुसरीकडे कुठेच मिळत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने या ज्ञानयज्ञ सप्ताहात येवून साधु संताचे आशीर्वाद घेत समाधानी आणि आनंदी राहिले पाहिजे असे प्रतिपादन महंत नामदेव महाराज शेकटेकर माऊली संस्थान बोरीपिंपळगाव यांनी व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा, शिवजयंती व नगदनारायण महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची महंत नामदेव महाराज शेकटेकर यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी मुरली आण्णा चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीमामा ढाकणे, माजी जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, दै.लोकाशाचे व्यवस्थापक अतुल भालशंकर, युवा नेत्या पूजा मोरे, धोंडराई सरपंच शितल साखरे, गौरव खराद, तळणेवाडी सरपंच अविनाश धस, सुंदरराव धस, उपसरपंच लहु शिंदे, पत्रकार विनोद पौळ, तुकाराम धस, विनायक उबाळे, वैभव जैन, विवेक कचरे, अंजिर पवार, मच्छिंद्र सपकाळ, विनोद कापसे, अमिन शेख, विक्रम भोसले, बाळासाहेब शिनगारे, अनिल मगर, तात्या भोसले यांच्या सह महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदेव महाराज म्हणाले की, मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने वरासाठी वधु मिळणेही कठीण झाले आहे. माय बापांनो स्त्री भ्रूणहत्या करु नका ते महापाप आहे.तसेच तरुणांनो व्यसनापासुन दुर रहा व व्यसनमुक्त जीवन जगा असा मौलिक सल्लाही नामदेव महाराज यांनी शेवटी बोलताना दिला.तर कीर्तनानंतर संतराम तुकाराम धस यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप आले. सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून यावेळी संत- महंत, सामाजिक शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी तळणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.