Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा

- काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी बीड जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बीड जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर स्वामीजींनी राष्ट्रभक्तीचे संस्कार रूजविण्याचे महान कार्य केले. या शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी  यांच्या सहकार्यामुळे वंदे मातरम् चळवळ, खादीचा प्रसार, हैद्राबाद मुक्तीसंग्राम यासारख्या जनहित चळवळी राबविता आल्या. स्वामी रामानंद तीर्थ भाषिक पुनर्रचनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले व त्यांचा विजय झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी मराठवाडा महाराष्ट्रा मध्ये बिनशर्त सामील झाला. १९१५ साली लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम.जोशी म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांचे नांव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्या संदर्भात सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. भाषिक प्रांत रचनेनंतर देखील स्वामीजींना आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या सर्व प्रदेशात जे आदराचे स्थान आहे. स्वामीजींनी महाराष्ट्रात बिनशर्त सामील होण्याचा निर्णय घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मराठवाड्याचे योगदान हैद्राबाद संस्थानात ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ लढा चालला ते स्वामी रामानंद तीर्थ प्रारंभापासून भाषावार प्रांतरचनेचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वामीजी गुलबर्गाचे खासदार असताना त्यांनी देशाच्या संसदेत त्यावेळी प्रस्ताव सादर केला की, भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र हा मराठी भाषिक प्रदेश व्हावा कारण, त्यावेळी महाराष्ट्राचा काही भाग गुजरात व काही भाग हैद्राबादला जोडण्याचा प्रयत्न सुरू होता.यासाठी स्वामीजींनी लढा दिला. भाषावार प्रांतरचनेचा प्रस्ताव मांडला. तो मताला टाकला. आणि जिंकला. त्यानंतर पं.नेहरू यांनी स्वामीजींचे अभिनंदन केले. भाषावार प्रांतरचना गरजेची आहे हे स्वामीजींनी पं.नेहरू यांना पटवून दिले. स्वामी रामानंद तीर्थ व पंडित नेहरू या दोन महापुरूषांना ही परस्परांबद्दल अतिशय आदर होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीत स्वामीजींचे अनमोल योगदान आहे. हे विसरता येणार नाही. भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात लोकसेवा यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स.१९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकार तर्फे घेण्यात आला. २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त भारतरत्‍न देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहेत. सध्या मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने आम्ही काॅंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करीत आहोत की, हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा मरणोत्तर देण्यात यावा, यासाठी राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर करून तो ठराव केंद्र सरकारला पाठवावा. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा राज्याच्या विधान भवनात व महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बसविण्यात यावा. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कलम ३७१ (अ) अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या इतिहासाचे, वास्तू आणि वस्तूंचे जतन करण्याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकातून हैद्राबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी विशेषांक प्रकाशित करण्यात यावा. मराठवाड्याचा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक, मुक्तीसंग्राम लढा, कृषी व सांस्कृतिक माहिती असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठवाडा सृष्टी संग्रहालय अजिंठा वेरूळ येथे उभारण्यात यावे. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची प्रलंबित पेंशन प्रकरणे निकाली काढावीत. अशी ही विनंती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे. गुरूवार, दिनांक ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी स्वामीजींचे पुतणे सुरेंद्र नाना खेडगीकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्याशी संवाद साधला. स्वामीजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. याप्रसंगी पत्रकार संजय मालाणी, राहूल मोरे पाटील, प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर, विश्वनाथ बाभुळगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

◼️ स्वामी रामानंद तीर्थ हे लोकप्रिय नेतृत्व : 

मराठवाड्यासह हैद्राबाद मुक्त करणारे सेनापती आणि अध्यात्मिकता व राजकारण यांचा विलक्षण संयोग साधलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ हे होते. तसेच ते मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते म्हणून ही सर्वत्र ओळखले जातात. मराठवाडा हा मोठा विभाग भारतात विलीन व संयुक्त महाराष्ट्रात विना अट सामिल करून भारतीय संघराज्य व्यवस्था मजबूत करण्याचे काम स्वामीजींनी केले आहे. भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, म्हणून सामाजिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा मरणोत्तर देण्यात यावा अशी मागणी आम्ही मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने करीत आहोत.

- राजेसाहेब देशमुख

(अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)


Friday 9th of February 2024 06:59 PM

Advertisement

Advertisement