मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
गेवराई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलक मोठ्या संख्येने सातत्याने आंदोलन करत आहेत. मुंबईत आरक्षणाची घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे. त्यातच आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशिर होत असल्याने एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नागझरी (ता. गेवराई) येथे घडली.
गेवराई तालुक्यातील नागझरी येथील हनुमान शिवाजी शिंदे (वय २७) या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशिर होत असल्याने हनुमानने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे हनुमान शिंदे याने आयटीआय केला होता. मात्र तो बेरोजगार होता. आरक्षण मिळाल्यास रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा त्याला होती. हनुमान शिंदे हा आरक्षणाच्या आंदोलनात सातत्याने सहभागी असायचा. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेलेला आरक्षण रॅलीतही शिंदे याने सहभाग नोंदवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि सर्वकाही व्यवस्थीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र आरक्षणाची घोषणा होवूनही अंमलबजावणीला उशिर होत असल्याने हनुमान शिंदे याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची आहे. हनुमान शिंदे याच्या पश्चात आई, बहिण असे कुटुंब आहे. या घटनेने गेवराई आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.