राज्यात १३ लाख ६७ हजार क्षेत्रावरील १९.५८ टन ऊस गाळपाअभावी अजूनही शिल्लक!
बीड, जालना व अहमदनगर या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक ऊस शिल्लक
अंबाजोगाई - याच आठवड्यात गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याने गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या फडाला आग लावून शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच राज्यात गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. राज्य शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आज ही शेतकऱ्यांच्या १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील १९.५८ टन ऊस अजूनही गाळपाअभावी शिल्लक आहे.
या संदर्भात राज्य शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या गळीत हंगामातील ऊसा पेक्षा या वर्षी जास्त पावूस झाल्यामुळे ऊसाच्या पे-यात मोठी वाढ झाली. गतवर्षी सन २०२०-२१ या वर्षी ११ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचा पेरा होता. यावर्षी जास्त झालेल्या पावसामुळे या पे-यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली. यावर्षी ऊसाची लागवड एकुण १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. या संपुर्ण क्षेत्रावरीरल १९.५८ लाख टन ऊस आज ही गाळपाअभावी शिल्लक आहे.
राज्य शासनाच्या उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक ऊस शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यात बीड चार प्रथम क्रमांक असून बीड जिल्ह्यात आज ४ लाख टन ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे तर त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील ३.९० लाख मेट्रिक टन तर अहमदनगर जिल्ह्यात ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाअभावी शिल्लक आहे. गाळपाअभावी ऊस शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्याच्या पाठोपाठ लातुर २.४२ लाख टन, उस्मानाबाद २.३८ लाख टन, सातारा १ लाख टन, नांदेड ०.६३ लाख टन, नंदुरबार ०.५० लाख टन, औरंगाबाद ०.३० लाख टन, परभणी ०.३० लाख टन, पुणे ०.२० लाख टन, जळगाव ० .२० लाख टन, हिंगोली ०.२० टन, नाशिक ०.१५ लाख टन, नागपुर ०.१० लाख टन, वर्धा ०.१० लाख टन, सोलापुर ०.१० लाख टन आणि बुलढाणा ०.१० लाख टन असा एकुण १९.५२ लाख टन ऊस गाळपाअभावी अजूनही शिल्लक आहे.
१९.५२ लाख टन ऊस गाळपाअभावी शिल्लक असतांनाही राज्यातील १२६ साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम १५ मे रोजी बंद केला आहे. २५ मे पर्यंत राज्यातील गाळप बंद केलेल्या साखर कारखान्यांची संख्या १६३ वर जाऊन पोहोचणार आहे. तर राज्यातील फक्त ३६ साखर कारखाने ३१ मे पर्यंत गाळप करणार आहेत.
राज्य शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार १६ मे पर्यंत १३००.६२ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. आता गाळपा अभावी शिल्लक राहिलेल्या १९. ५२ लाख टन ऊसापैकी किती गाळप होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
