उष्णतेच्या लाटेचा शेती पिकांवर परिणाम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - वाढलेले तापमान, पडलेला उन्हाचा चटका याचा परिणाम शेतीपिकावर
झालेला पाहावयास मिळत आहे. या उष्णतेच्या लाटेचा फार मोठा परिणाम पिकांवर झालेला दिसत आहे.
एप्रिल व मे महिन्यात काही ठिकाणी द्राक्ष बागांच्या खरड छाटणीची कामे चालू असतात. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या खरड छाटणीच्या बागा बर्यापैकी फुटलेल्या आहेत. परंतु चालू महिन्यात खरड छाटणी करण्यात आलेल्या बागा उष्णतेच्या तीव्रतेमुळे फुटत नसलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर हा नवीन प्रश्न उभा राहिला आहे. उशिरा छाटणी केलेल्या बागाकमी प्रमाणात फुटल्या असून काडीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम होणार आहे. सध्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाचे चटके कमी झाले असून बाग फुटण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परंतु शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
ज्या शेतकर्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बागांच्या छाटण्या केलेल्या आहेत, त्या चांगल्या फुटलेल्या आहेत. तर 20 एप्रिलच्या पुढे छाटणी केलेल्या बागा मात्र उष्णतेच्या लाटेमुळे कमी प्रमाणात फुटलेल्या पाहावयास मिळत असून झाडावर काड्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांची अवस्था ‘कही खूशी कही गम’ अशी झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे कांही शेतकर्यांनी खरड छाटणी केलेले ओलांडे पाण्याने फवारणी करून भिजवले होते. तरीदेखील
बागा फुटत नाहीत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा मोठा परिणाम शेती पिकांवर झाला आहे.
