प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचाही मृत्यू
माजलगाव - शहरातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा रक्तस्त्राव न थांबल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी बाळाचाही मृत्यू झाला असून या घटनेनंतर चुकीची घटना घडू नये, यासाठी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
सोनाली पवन गायकवाड (वय २१, रा. खेर्डा, ता. माजलगाव) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीची प्रसूतीची वेळ भरत आल्याने तिला रविवारी संध्याकाळी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या जाजू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोनालीला रात्रभर त्रास होत असल्याने तिच्या घरातील मंडळींनी डॉ. उर्मिला विजयकुमार जाजू व विजयकुमार जाजू यांना सिझर करा असे सांगितले. परंतु, डॉक्टरांनी त्यांचे न ऐकता सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नॉर्मल प्रसुती केली. यावेळी झालेल्या बाळाचे वजन देखील जास्त भरले होते. प्रसूती झाल्यानंतर महिलेचा रक्तस्राव न थांबल्याने सोनालीचा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर सोनालीचे संतप्त नातेवाईक रुग्णालयात जमा झाले होते. या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराठे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
