महाराष्ट्रातील निवडणुका कधी यावर मंगळवारी होणार निर्णय
मुंबई - महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला आता सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 17 मे दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर 17 मे रोजी कळणार आहे.
राज्यात निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
राज्यात निवडणुका पावसाळ्यानंतर आणि त्याही महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. तसं झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे.
