Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईचा अनमोल सांस्कृतिक ठेवा जोपासा-डॉ.अरुण डावळे

९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उदघाटन

अंबाजोगाई-(हरिहर मातेकर साहित्य नगरी) सर्वच क्षेत्रात 

अंबाजोगाईच्या मातीने अनेक मोठी माणसं दिली.अंबाजोगाईचा साहित्यिक,सांस्कृतिक असा अनमोल ठेवा.जतन करा.हा वारसा अखंडपणे सुरू ठेवा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.अरुण डावळे यांनी केले.

                      येथील जेष्ठ नागरिक संघ व मराठवाडा साहित्य परिषद, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी  मुकुंदराजस्वामी सभागृहात  आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या  अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणुन डॉ.अरुण डावळे बोलत होते.व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.कमलाकर कांबळे,विद्या कांबळे,  स्वगताध्यक्ष कमल बरुरे,

मावळते अध्यक्ष गणपत व्यास,मावळते स्वागताध्यक्ष प्रा.संतोष मोहिते,जेष्ठ नागरिक संघाचे कुंडलिक पवार,सरस्वती फड,मसाप शाखेचे अध्यक्ष अमर हबीब,उपाध्यक्ष डॉ.राहुल धाकडे,कार्यकारिणी सदस्य दगडु लोमटे,डॉ.श्रीहरी नागरगोजे,एस.बी.सय्यद,उपस्थित होते.

      या वेळी बोलताना डॉ.डावळे म्हणाले प्राचीन काळापासून अंबाजोगाई शहराची वेगळी ओळख आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीचे केंद्र असलेल्या या शहराची स्वतंत्र ओळख आहे. ती जोपासा.या मातीतच उपजत गुण असल्याने सर्वच क्षेत्रात नवीन पिढी निर्माण झाली आहे. या पिढीने अंबाजोगाईचा वारसा जपला पाहिजे.असे सांगुन मातृभाषेचा केवळ अभिमानच न बाळगता त्या भाषेतूनच शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य द्या.तसेच अंबाजोगाई जिल्हा निर्मिती चा ठराव संमेलनात घ्यावा.अशी मागणी ही त्यांनी केली.

            आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ कमलाकर कांबळे म्हणाले की लेखकांनी  उदात्त  जीवनमूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत केली पाहिजेत.आपले लक्ष्य आंकुचित मर्यादित ठेऊ नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंती पुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्यापाड्यातील  गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तीत करा. आपल्या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दुःखितांचं फार मोठं जग आहे, हे विसरू नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी झटा. त्यातच खरी मानवता आहे.असे त्यांनी सांगितले.यावेळी 

मावळते अध्यक्ष गणपत व्यास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर 

स्वागताध्यक्ष कमल बरुरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणपत व्यास यांनी नवव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ कमलाकर कांबळे यांना दिवा सोपवुन संमेलनाची सूत्रे हस्तांतरित केली.सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष यांनी केले.जेष्ठ नागरिक संघाच्या संचाने स्वागतगीत गायले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राहुल धाकडे यांनी केले.संचलन अमृत महाजन यांनी तर उपस्थितांचे आभार मनोहर कदम यांनी मानले.

पुरस्काराचे वितरण-:

या वेळी अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार डॉ. अकिला  गौस यांना,

 डॉ. शैला लोहिया लेखिका पुरस्कार - डॉ. अलका तडकलकर यांना, तर  मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार बालाजी सुतार यांना शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या पुस्तकांचे झाले प्रकाशन-:

नवव्या साहित्य संमेलनात साहित्य परिषदेच्या वतीने जयवंती या कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तर जेष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांनी लिहिलेल्या योगेश्वरी चे ज्ञानदूत,इंदू पल्लेवार यांच्या आकंठ,शीला कांबळे यांच्या ऋणानुबंध,किसन शिनगारे यांच्या झुंज कडवी द्यावी लागेल,तर तर वसुंधरा महाविद्यालयाच्या शब्दाई  तसेच जयवंती ची काव्यधारा या ईबुक चे  प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

           जागर दिंडी

९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना निमित्त जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दिंडी वेणूताई कन्या विद्यालया पासून ते संमेलन स्थळापर्यंत निघाली होती. या दिंडीत संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.कमलाकर कांबळे,स्वागत अध्यक्ष कमल बरुरे,मावळते अध्यक्ष गणपत व्यास,संमेलनाचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व साहित्य प्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीचे संयोजन मुजीब काजी यांनी केले.

Saturday 4th of December 2021 06:48 PM

Advertisement

Advertisement