Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

अंबाजोगाई : पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे ‘रबी हंगाम नियोजन व व्यवस्थापन’ या विषयावर ‘शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अंबाजोगाई येथील इतिहास संशोधक डॉ. शरद हेबाळकर यांनी केले. आत्मा बीड, प्रकल्प संचालक  दत्तात्रय मुळे व कृषीविस्तार विद्यावेत्ता अरुण गुट्टे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख नरेंद्र जोशी होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीविद्या शास्त्रज्ञ कृष्ण कर्डिले यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पं. दीनदयाळ या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विचार शेतकऱ्यांमध्ये पोचवण्यासाठी यांच्या जयंतीच्या औचित्याने शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच रबी  हंगामाच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये पोचवण्यासाठी व अतिवृष्टीच्या परिस्थितीत रबी हंगाम नियोजन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.


उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. हेबाळकर यांनी सांगितले की, पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार समाजात पसरले पाहिजेत. पं. दीनदयाल उपाध्याय भारतीय जनसंघाच्या माध्यमातून राष्ट्रहिताचा विचार समाजात पसरवण्यात यशस्वी झाले. भारतातील सर्व धर्म, समाज, परंपरा यांना अनुकूल विकास प्रक्रिया झाली पाहिजे असे दीनदयाळ यांचे विचार होते. राष्ट्र विकासाचे अधिष्ठान दीनदयाळ उपाध्याय यांनी भारताला दिले. दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एकात्म मानवदर्शन हे तत्त्वज्ञान दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडले. राष्ट्रीय कार्यामध्ये आपला सहभाग असावा यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


आत्मा प्रकल्प संचालक मुळे यांनी बोलताना सांगितले की, भारतीय विकासाची वाटचाल महापुरुषांच्या विचारांवर आधारित होत आहे. अशा महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातून नवा उत्साह समाजामध्ये संचारतो. यावेळी त्यांनी आत्मा माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. पोक्रा योजनेच्या माध्यमातून जिल्हाभरात शेतकऱ्यांना विविध लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अवजारे बँक योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक कंपन्या घेत आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात शेतकरी कंपन्यांचे फेडरेशन तयार केले आहे. शेतीमध्ये गुंतवणूक व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाच्या आहेत. मूल्यवर्धन साखळीमध्ये अनेक शेतकरी कंपन्या काम करीत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.


गुट्टे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यावर असून, रबी हंगामाची सुरुवात होत आहे. २० वर्षानंतर सलग ३ वर्षे पर्जन्यमान १०० टक्केच्या पुढे जाण्याची घटना घडली आहे. सोयाबीन पिकाला मिळणाऱ्या बाजार भावामुळे सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढलेले आहे. सोयाबीनच्या एकपीक पद्धतीमुळे विविध किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे. पुढील वर्षी सोयाबीनची पेरणी करताना प्रत्येक ४ ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडावी लागणार आहे. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. बीड जिल्ह्यात रबी हंगामात हरभरा पीक महत्त्वाचे आहे. हरभरा पिकातील मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा रोग प्रामुख्याने मुळाद्वारे होतो. याच्या व्यवस्थापनासाठी बियाण्याची निवड काळजीपूर्वक करावी. मर रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील बियाणे वापरू नये. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. रासायनिक व जैविक अशा दोन्ही प्रकारच्या बीजप्रक्रिया कराव्यात. तसेच हरभरा पिकातील खत व्यवस्थापन व सिंचन नियोजन या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. करडई पिकाचे क्षेत्र वाढत आहे. विद्यापीठाद्वारे विकसित सुधारित वाणांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. 


शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना व प्रोत्साहन या विषयावर मार्गदर्शन करताना, कृषि विज्ञान केंद्राचे कृषीविस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी सांगितले की, समूह आधारित व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे काम करत आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा व विपणन व्यवस्थापन या घटकांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जोशी यांनी सांगितले की, पं. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार समाजाला नेहमी प्रेरणा देणारे असून त्यामध्ये सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार केलेला आहे. रबी हंगामाच्या दृष्टीकोनातून नियोजन व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्यामुळे भरघोस पीक उत्पादनाची संधी शेतकऱ्याना उपलब्ध झाली आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप व रबी हंगामातील पिकातील समस्या व उपयायोजना विषयी शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधला. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके यांनी केले तर आभार कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 25th of September 2021 08:27 PM

Advertisement

Advertisement