Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

लोखंडी सावरगाव येथे स्वाभिमानीचा चक्काजाम

अंबाजोगाई : अंबाजोगाई - बीड जिल्ह्यात सतत 15 दिवस पडलेल्या बेमोसमी मुसळधार अतिवृष्टीने खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद, मूग,मका,हायब्रीड ज्वारी, बाजरी आदी सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 1 लक्ष रु नुकसान भरपाई व सरसकट पीकविमा तात्काळ वाटप करण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना केज,अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे आज बुधवार दि 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता तब्बल 2 तास चक्काजाम आंदोलन आज केले.आंदोलनामुळे बीड-लातुर-अंबाजोगाई-कळंब महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती.

प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन करून चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. यावेळी माजी. आ. पृथ्वीराज साठे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे,बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,जि.प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, शेतकरी नेते जयजीत बापू शिंदे, कमलाकर लांडे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लोकजनशक्ती चे राजेश वाहूळे,अंजली पाटील,अंबाजोगाई ता. अध्यक्ष योगेश शेळके,लहू गायकवाड, महेश गंगणे ,प्रमोद पांचाळ,अनिल रांजनकर, परमेश्‍वर वीर,अभिजीत लोमटे, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे,भागवत पवार ,शशिकिरण ढगे, आदी संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे केज,अंबाजोगाई तालुक्यातील मित्रपक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते.

वरिल नमूद सर्वच पदाधिकर्‍यांनी समायोचित भाषणे करत निष्क्रिय काळजीवाहू सरकारवर टीकास्त्र सोडले.सरकारने आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नये तात्काळ सरसकट नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय आपत्ती मधून हेक्टरी 1 लक्ष रु व सरसकट विना अट पीकविमा वाटप करावा अशी मागणी जोरदार पणे करण्यात आली.जर 10 दिवसात नुकसानभरपाई नाही दिल्यास बीड जिल्ह्यातील कोणतेही सरकारी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चालू देणार नाहीत सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच सर्व गावबंद करून जिल्ह्यात व्यापक बेमुदत जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी प्रशासनाला दिला.

सदर आंदोलनाची दखल घेत अंबाजोगाई तहसीलदार श्री. रुईकर यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवपुरावा केला जाईल असे आश्‍वासन दिल्याने चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले.सदर आंदोलनाला लोखंडी सावरगाव, आपेगाव, धानोरा, सोमनाथ बोरगाव,हिवरा, सनगाव,श्रीपतरायवाडी,आदी परिसरातुन मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. अंबाजोगाई ग्रामीण चे  पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चक्का जाम आंदोलन शांततेत संपन्न झाले.

Wednesday 6th of November 2019 05:00 PM

Advertisement

Advertisement