Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा मिटायला हवा - प्रदिप देशमुख

अंबाजोगाई : अंबाजोगाई - मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर मराठवाड्यातला पाणी प्रश्न कायमचा मिटायला पाहिजे.नांदुर,मदमेश्वर प्रकल्प पूर्णत्वास न्यायला हवा.सरकारचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष आहे.मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी एकत्रीत लढा देण्याची गरज आहे.पाण्याच्या बाबतीत जागृकता निर्माण व्हावी.असे आवाहन औरंगाबाद येथील अॅड.प्रदीप देशमुख यांनी केले.

ते अंबाजोगाई येथील नागापूरकर सभागृहात आयोजित योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव एस.के.बेळुर्गीकर होते. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी जायकवाडी धरण अत्यंत महत्वाचे आहे. न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी जायकवाडी धरणाचे रेखांकन करावे असे आदेश सरकारला दिलेले आहेत. परंतु शासन जाणूनबूजून रेखांकन करत नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे.असा आरोप ॲड.देशमुख यांनी केला. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पर्जन्यमान गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यामध्ये अत्यंत कमी झाले आहे. पाणी प्रश्नावरून तिसरे महायुद्ध होऊ शकते ही जगाने शक्यता वर्तवलीआहे.

पाण्याची समस्या भयावह झालेली आहे. मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळाने होरपळून जात असला तरी शासन मात्र पाण्याच्या प्रश्नावर गंभीर नाही.राज्यात सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत ,त्याचे कारण म्हणजे एकमेव म्हणजे शेतीसाठी सिंचनाची सोय नाही. म्हणून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. याची दखल सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. परंतु तसे होताना दिसत नाही. गोदावरी खोर्‍यावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून आहेत. जायकवाडी धरणाच्या वरती तेवीस प्रकल्प बांधण्यात आल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याने तब्बल बेचाळीस टीएमसी पाणी पळवले असल्याचे ॲड देशमुख यावेळी म्हणाले. सन २००५ च्या पाणी कायद्याची शासनाने अंमलबजावणी केल्यास पाण्याचे समन्यायी वाटप होणार आहे. समन्यायी शब्दाचा अर्थ समान असा नसून गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे वाटप असा होतो. माजलगाव व मांजरा धरणामध्ये पाणी न येण्यासाठी शासनच जिम्मेदार असल्याचे त्यावेळी ते म्हणाले. पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील जनतेने प्रखर आवाज उठवायला हवा. आतापर्यंत मराठवाड्याचे मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री असतानाही मराठवाडा पाण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी मागासलेलाच राहिला आहे. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

न्यायालयाने शासनाला चौदा सूचनांचे पालन करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यापैकी अवघ्या चार सूचनांचे पालन शासनाने केलेले असल्याने मराठवाड्यात दुष्काळ कायम राहिला आहे. शासनाने नुकतेच मराठवाड्यामध्ये वॉटरग्रीड च्या माध्यमातून पाणी देणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु कधी मिळणार ? याची डेडलाईन मात्र अद्याप सांगितलेली नाही. मराठवाड्यातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शासनाला जाब विचारला पाहिजे. त्याशिवाय शासन जागे होणार नाही.असेहीअॅड.देशमुख म्हणाले पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. व्ही.एम. चौधरी, सहमुख्याध्यापिका सौ. एम.एस.कूलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सहशिक्षिका अनिता लोंढे यांनी तर पाहुण्यांचापरिचय देऊन उपस्थितांचे आभार सहशिक्षिका सौ.शुभांगी क्षीरसागर यांनी मानले.कार्यक्रमास सर्व संस्था पदाधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 11th of September 2019 03:15 PM

Advertisement

Advertisement