Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

अंबाजोगाई तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदन कुलकर्णी यांची माहिती

अंबाजोगाई : अंबाजोगाई - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त रविवार,दि. 8 सप्टेंबर आज रोजी तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धा तसेच साक्षरता विषयक प्रसार व प्रचार हवा या उद्देशाने विविध शाळा व तालुक्यातील गाव पातळीवर हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती निरंतर शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदन कुलकर्णी यांनी दिली आहे.

पुर्वी लिहिता वाचता येणे व अंकगणित करता येणे एवढ्या पुरतीच साक्षरता मर्यादीत होती.परंतु,आता कार्यात्मक साक्षरता (फंक्शनल लिटरसी) याला महत्व प्राप्त झाले आहे.यामध्ये अर्थ,जल, आरोग्य,विधी,संगणक आदी विषयक साक्षरतेचा व्यापक दृष्टीकोण आपेक्षीत आहे.त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यात शालेय स्तरापासुन विद्यार्थ्यांना समर्थ व सक्षम करता यावे तसेच भारताला सक्षम करण्यासाठी तो विद्यार्थी कार्यात्मक दृष्ट्या साक्षर असला पाहिजे हा विचार रूजविण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची औचित्य साधुन विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे.

8 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळेत गाव पातळीवर साक्षरता दिनानिमत्त विविध उपक्रम आयोजित केले असून त्याच बरोबर तालुका स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चित्रकला, वर्क्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी विविध शाळांमधून प्रत्येक गटातून तीन विद्यार्थी हे स्पर्धक म्हणुन सहभागी होणार आहेत. गुणवंतांना पारितोषिक व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धा ही पाचवी ते सातवी या गटात होणार असून त्यासाठी ‘जलसाक्षरता' हा विषय देण्यात आला आहे.तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी गटासाठी चित्रकला स्पर्धेकरीता ‘संगणक साक्षरता' हा विषय देण्यात आला आहे.सदर स्पर्धा ही गोदावरील कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा येथे बुधवार, दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा ही दोन गटात होत आहे.

. पाचवी ते सातवी गटासाठी,‘मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण' आणि आठवी ते दहावी गटासाठी,‘विधी साक्षरता काळाची गरज' या विषयावर होत असून योगेश्‍वरी नूतन विद्यालय या ठिकाणी ही स्पर्धा सकाळी 11 वाजता होत आहे. निबंध स्पर्धा दोन गटात आयोजित केली असून इयत्ता 5 वी ते 7 वी गटासाठी,‘शिकवा एक तरी' हा विषय असून इयत्ता 8 वी ते 10 साठी ‘साक्षर भारत समर्थ भारत' हा विषय आहे. सदर स्पर्धा ही गोदावरील कुंकूलोळ योगेश्‍वरी कन्या शाळा येथे बुधवार,दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. तरी चित्रकला,वक्तृत्व व निबंध या तीनही स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून साक्षरतेचे महत्व जाणून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन निरंतर शिक्षण विभागचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंदन कुलकर्णी यांनी केले आहे.

Saturday 7th of September 2019 05:00 PM

Advertisement

Advertisement