Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

राज्यात मुसळधार; मांजरा धरण मात्र कोरडेच!

अंबाजोगाई : अंबाजोगाई : राज्यात बहुतांशी ठिकाणी मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडालेला आहे. अनेक गावं पाण्याखाली आहेत. मात्र, मराठवाडा विशेषतः बीड जिल्हा अद्याप कोरडाठाक आहे. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांनी तळ गाठला आहे. बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा अद्याप शून्यावरच आहे. पावसाने पाठ फिरवल्याने धनेगाव येथील मांजरा धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही महिन्यातच तिन्ही जिल्ह्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मांजरा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मात्र, सध्या या धरणात केवळ ६.५८ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. पावसाळा चालु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मांजरा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी धरणात पावसाळ्यात पाणी वाढण्या ऐवजी दररोज घट होत आहे. धरणातुन लातुर शहर व लातुर एमआयडीसीसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , केज, धारुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळपास १४ गावापेक्षा अधिक गांवाना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणीसाठ्यातुन दररोज ०.००७ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणीपुरवठा योजनेतून दररोज ०.०४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे वरचेवर पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तीन वर्षापूर्वी हे धारण सलग दोन वर्षे ओसंडून वाहिले होते. मात्र, मागील दोन वर्षात पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. यंदाही तीच परिस्थिती कायम असल्यामुळे आगामी काळात या भागवर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Friday 9th of August 2019 12:45 AM

Advertisement

Advertisement