सरपंच पतीचा पंचायत समितीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न
केज :- घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे शोषखड्डे व सार्वजनिक शौचालय बांधकाम या कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन बिल काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला सरपंचाकडे ५० हजार रुपयेची मागणी केली. त्या पैकी त्यांना २० हजार रु. देऊनही ३० हजार रु. न दिल्यामुळे त्यांनी बिल काढले नसल्याने व्यथित होऊन संतप्त झालेल्या सरपंच पतीने केज पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला.
केज तालुक्यातील डोका येथील महिला सरपंच कमल गोरख भांगे यांनी गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी नियोजन यासाठी आणि सार्वजनिक शौचालय याची कामे केलेली आहेत. सर्व कामे पूर्ण होऊन देखील त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन त्यांच्या बिलासाठी त्यांनी वारंवार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कागद-पत्रांनिशी मागणी केली. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता आंधळे, कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता वंदना साळवे या दोघांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्याकडे ५० हजार रु. ची मागणी केली.
गोरख भांगे यांनी कार्यकारी अभियंता आंधळे यांना त्यापैकी २० हजार रुपये त्यांना नगदी दिले. मात्र अद्यापही त्यांचे विल निघाले नाही. त्या बाबत त्यांनी चौकशी केली असता उर्वरित ३० हजार रुपये जो पर्यंत देणार नाहीत; तोपर्यंत बिल मिळणार नाही. अशी अरेरावीची भाषा वापरली, तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच पती गोरख भांगे यांनी २० मार्च रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास केज पंचायत समितीच्या इमारतीमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाची माहिती मिळताच प्रभारी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने काळे यांनी केज पोलिसांना फोन करून त्यांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड आणि त्यांचे पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी सरपंच पती गोरख भांगे यांना आत्मदहन करण्यापासून रोखले.
सरपंच पती गोरख भांगे हे त्यांच्या केलेल्या कामाच्या बिलापोटी प्रशासनाकडून होत असलेली अडवणुकीची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी देत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने-काळे यांनी पत्रकारांनी याचे व्हिडिओ किंवा फोटो घेऊ नयेत म्हणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
