Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८: राज्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करुन बाकी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत  प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणला जाईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी दिली.

यासंदर्भात सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर यांनी सहभाग घेतला.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा लाभ मंजूर केल्यानंतर जे अर्ज शिल्लक राहतात अशा लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश केल्यास त्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण होईल.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी 130 कोटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी 42 कोटीचा रुपये निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनांसाठी निधीची अडचण नाही. या योजनेअंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना 1.30 लाख आणि अन्य लाभार्थ्यांना 1.20 लाख रुपये अनुदान दिले जाते.

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत मुदतीत सादर केल्यानंतर त्यांना देय असलेला अनुदान हप्ता त्वरित दिला जात आहे. राज्यात 36 हजार 374 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, पहिला हप्ता 32 हजार 63 घरांना, दुसरा हप्ता 17 हजार 263 घरांना, तिसरा हप्ता 13 हजार 408 घरांना आणि अंतिम हप्ता 7 हजार 954 घरांना वितरीत करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील घरांना स्वतंत्र सौरऊर्जा देण्याऐवजी सोलर पार्क उभारून त्या माध्यमातून वसाहतींना वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येईल असेही,मंत्री सावे यांनी सांगितले.

तसेच गाव नमुना आठ आणि मालकी हक्कासाठी यापूर्वी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा असे कॅम्प आयोजित करण्यात येतील, असेही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे यांनी सांगितले.

Wednesday 19th of March 2025 01:14 PM

Advertisement

Advertisement