Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेस मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा

- जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय

बीड : बीड - या आपले शहर घडवूया या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा आज राबविण्यात आला. यावेळी अभियानात शहरातील नागरिक, खेळाडू, खेळ संघटना, प्रशिक्षक व स्वयंसेवी संस्थानी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुलाच्या स्वच्छतेसाठी मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवत असून याच्या पुढच्या टप्प्यात अधिकाधिक नागरिक, युवक, महिला, खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करताना क्रीडा संकुल व शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी यांच्याबरोबर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली. दुसरा टप्यात सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये क्रीडा संकुलाचे इनडोअर हॉल, पॅव्हेलीयन, वस्तीगृह आदी पाण्याने स्वच्छ धुवून भिंतीवर पांढऱ्या रंगाने रंगरंगोटी करण्यात आली. या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या स्वच्छतेमुळे जुनी कात टाकून जिल्हा क्रीडा संकुल नव्या रूपात समोर येऊ लागले आहे.

स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वतः जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय सकाळी 7 पासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उप-विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे, एन.आय.सी चे प्रमुख प्रविण चोपडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरखूलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह हजर होते. आपले पद विसरून वरिष्ठ अधिकारी खराटा, रंग देण्याचे ब्रश हातात घेऊन मोहिमेमध्ये मग्न झाले होते. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ज्येष्ठ खेळाडू जे.पी. शेळके, क्रीडा संघटक डॉ.अविनाश बारगजे, अजहर शेख, रेवननाथ शेलार, धनेश करांडे, मुकेश बिराजदार, किशोर काळे, रतन कोकाटे, शिवछत्र बॅडमिंटन संघटना, विविध सामाजिक व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व खेळाडूं यामध्ये सहभागी झाले. क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाच्या शेकडो खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व बीड नगर परिषदे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने असणारा सहभाग लक्ष वेधून घेत होता. यासाठी नगर परिषदेच्या वतीने दोन मोठे अग्निशमन बंब व दोन लहान पाण्याचे टँकर, कचरा वाहतुकीसाठीच्या घंटागाड्या, ट्रॅक्टर, स्वच्छते साठी लागणारे साहित्य आदी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती.

क्रीडा संकुलाच्या भिंतींवर रंगणार प्रेरणादायी चित्रे मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात येत्या शनिवारी दि. 7 डिसेंबर रोजी विद्यार्थी, युवक, चित्रकार यांनी नागरिकांसह मोहिमेत सहभाग घ्यावा. यावेळी त्यांना क्रीडा संकुलाचा भिंतींवर चित्र काढण्यासाठी कलर व ब्रश उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना क्रीडासंकुल सुंदर बनविण्याच्या या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येईल. चित्ररंगवा मोहिमेत सहभागासाठी नाव नोंदणी बीड तहसील कार्यालयातील विशेष कक्ष कार्यालयीन वेळेत करावी, असे आवाहन यांनीही यावेळी करण्यात आले.

Saturday 30th of November 2019 05:30 PM

Advertisement

Advertisement